मराठी व्याकरण संधी व त्याचे प्रकार
संधी :- व्याख्या व उदाहरणे.
जवळ जवळ आलेले दोन ध्वनी जोडण्याला संधी म्हणतात. संधी होत असतांना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि शेवटच्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळून त्या दोहोबद्दल एकच वर्ण तयार होतो याला संधी असे म्हणतात.
संधी म्हणजे एक प्रकारची जोडाक्षरे होय. काही उदाहरणे पाहू .
सूर्यास्त = सूर्य + अस्त
ईश्र्वरेच्छा = ईश्र्वर + इच्छा
संधीचे प्रामुख्याने 3(तीन) प्रकार पडतात ते आपण पाहू.
१.स्वरसंधी
२.व्यंजन संधी
३.विसर्गसंधी
प्रथम आपण स्वरसंधी हा प्रकार पाहणार आहोत.
स्वरसंधीचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात
१.दिर्घत्व संधी
२.आदेश संधी
आदेश संधीचे पुढे सहा प्रकार पडतात
क. गुणदेश संधी ख. वृद्धयादेश संधी
ग. यणादेश संधी घ. विशेष आदेश संधी
च. पूर्वरूप संधी छ. पररूप संधी
१.दिर्घत्व संधी :- सजातीय र्हस्व किंवा दीर्घ स्वर मिळून एकच दीर्घ स्वर तयार होतो त्याला दीर्घत्व संधी म्हणतात.
काही उदाहरणे.
१. वृद्धाश्रम = वृद्ध + आश्रम
२. गुरूपदेश = गुरु+उपदेश
३. कविच्छा = कवी+ईच्छा
आणखी बरीच उदाहरणे देता येतील.
२.आदेश संधी :- जेव्हा दोन विजातिय स्वर एकत्र येऊन तयार होणार्या संधीला आदेश संधी म्हणतात.
आत आपण आदेशसंधी चे प्रकार पाहू.
क) गुणादेश –
या प्रकारात अ किंवा आ या स्वरापुढे जर इ किंवा ई स्वर आल्यास तर त्या दोहोंऐवजी ए हा स्वर येतो, जर उ किंवा ऊ हा स्वर आल्यास तर त्या दोहोंऐवजी ओ स्वर येतो आणि जर ऋ हा स्वर आल्यास तर त्या दोहोस्वरांमिळून अर येतो यालाच गुणादेश संधी असे म्हणतात.
उदाहरणे.
१) सुरेंद्र = सुर+इंद्र
२) राजर्षी = राजा+ऋषी
३) चंद्रोदय = चंद्र+उदय
ख) वृद्ध्यादेश –
जर अ आणि आ या स्वरापुढे ए किंवा ऐ स्वर आल्यास तर त्याबद्दल ऐ हा स्वर येतो आणि ओ किंवा औ स्वर आल्यास तर त्याबद्दल औ हा स्वर येतो. यालाच वृद्ध्यादेश (वृद्धि+आदेश) संधी म्हणतात.
उदाहरणे .
१) प्रजैक्य = प्रजा+ऐक्य
२) मतैक्य = मत+ऐक्य
३) क्षणैक = क्षण+एक
४) जलौध = जल+ओध
ग) यणादेश –
जर इ, उ, ऋ, (र्हास्व किंवा दीर्घ) या स्वरांपुढे खालीलपैकी कोणताही विजातीय स्वर आल्यास तर इ-ई या विजातीय स्वराऐवजी य हा वर्ण येतो, उ-ऊ विजातीय स्वराऐवजी व हा वर्ण येतो. ऋ या स्वराऐवजी र हा वर्ण येतो आणि पुढील स्वर मिसळून यणादेश संधी तयार होते.
उदाहरणे.
१) इत्यादी = इति+आदी
२) प्रत्येक = प्रति+एक
३) मन्वंतर = मनू+अंतर
घ) विशेष आदेश –
जेव्हा ए, ऐ, ओ किंवा औ या संयुक्त स्वरांपुढे अनुक्रमे ए या संयुक्त स्वराऐवजी आय्, ऐ या संयुक्त स्वराऐवजी आय्, ओ या संयुक्त स्वराऐवजी अव्, औ या संयुक्त स्वराऐवजी आव् असे वर्ण मिसळून आदेश तयार होऊन त्यास पुढील स्वर मिसळून विदेश आदेश संधी तयार होते.
उदाहरणे.
१) नयन = ने+अन
२) गवीश्वर = गो+ईश्वर
च) पूर्वरूप संधी –
आपल्या मातृभाषेत म्हणजेच मराठीत काही वेळेस संधी होत असतांना एकत्र येणार्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो व दुसर्या स्वराचा लोप होतो. या संधीला पूर्वरूप संधी असे म्हणतात.
उदाहरणे.
१) लाडूत = लाडू+आत
२) नदीत = नदी+आत
छ) पररूप संधी –
केव्हा केव्हा एकत्र येणार्या दोन स्वरांपैकी पहिल्या स्वराचा लोप होतो व दूसरा स्वर कायम राहतो. अशा प्रकारच्या संधीला पररूप संधी म्हणतात.
उदाहरणे .
१) घरी = घर+ई
२) सांगेन = सांग+एन
३) करून = कर+ऊन
आजच्या भागात आपण स्वरसंधी पाहिले .
पुढच्या भागात व्यंजनसंधी पाहू .
Comments
Post a Comment